Hero Image

Pune University News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न १०० हून अधिक कॉलेजांना टाळे लागणार

Pune University News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न ११० महाविद्यालयांची संलग्नता काढण्यात येणार असल्याने येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२४-२५) य़ा कॉलेजांना टाळे लागणार आहे. या कॉलेजांमध्ये यंदापासून कोणत्याही प्रकारची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार नसल्याची माहिती आहे. या महाविद्यालयांमध्ये प्रामुख्याने कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालये आहेत.
या महाविद्यालयांची यादी एप्रिल अखेरपर्यंत विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांत सध्या सुमारे ८०० महाविद्यालये पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. या महाविद्यालयांना पुणे विद्यापीठाची संग्लनता मिळवण्यासाठी विविध शैक्षणिक सुविधांची पूर्तता केल्यानंतर संलग्नता शुल्क भरावे लागते. त्यांनतरच पुणे विद्यापीठाची संलग्नता संबंधित कॉलेजला मिळते. मात्र, पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील ११० कॉलेजांनी गेल्या काही वर्षांपासून संलग्नता शुल्क भरलेले नाहीत.
याशिवाय या कॉलेजांमध्ये शैक्षणिक सुविधा आणि प्रवेश प्रक्रियेबाबतही संदिग्धता आहे. यातील अनेक कॉलेजांमध्ये विद्यार्थी संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. या सर्व बाबींचा विचार करता, संबंधित कॉलेजांची संलग्नता काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत या कॉलेजांची संलग्नता काढण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर या कॉलेजांची यादी पुणे विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत :
शिक्षणसंस्थांकडून कॉलेज काढण्यासाठी राज्य सरकारची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. त्यानंतर सरकारकडून कॉलेजला इरादा पत्र देण्यात येते. या प्रक्रियेनंतर विद्यापीठाकडून संलग्नता देण्यात येते. मात्र, त्यानंतर संस्थांकडून कॉलेजला आर्थिकदृष्ट्या चालवणे शक्य होत नाही. कॉलेजांमध्ये आवश्यक पायाभूत आणि शैक्षणिक सोयीसुविधा कागदावरच राहतात. त्यामुळे अशा प्रकारच्या कॉलेजांमध्ये फार कमी विद्यार्थी प्रवेश घेतात. असे कॉलेज आर्थिकदृष्ट्या तोट्यात जातात. पुढे जाऊन संबंधित कॉलेज संलग्नता शुल्कही भरू शकत नाही.
प्राचार्य, प्राध्यापक नाहीत : पुणे विद्यापीठाने काही महिन्यांपूर्वी कॉलेजांमध्ये पूर्णवेळ प्राचार्य नेमण्याचे आदेश दिले होते. त्याचप्रमाणे प्राध्यापकांची रिक्त पदेही भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. यातील अनेक कॉलेज तोट्यात असल्याने, कॉलेजच्या प्रशासनाला प्राचार्यांची आणि प्राध्यापकांची पदे भरणे शक्य झाले नाही. याबाबत विद्यापीठाच्या प्रशासनाने वेळोवेळी संबंधित कॉलेजांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
अशा कॉलेजांच्या विरोधात विद्यापीठाच्या प्रशासनाने कारवाई करायला सुरुवात केली आहे. कॉलेजांमध्ये काही त्रुटी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न १००पेक्षा अधिक कॉलेजांनी संलग्नता शुल्क भरलेले नाही. त्याचप्रमाणे या कॉलेजांमध्ये काही त्रुटीही आढळून आल्या आहेत. या कॉलेजांमध्ये विद्यार्थी नाहीत; तसेच विद्यार्थ्य़ांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊन संलग्नता काढण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या माहितीसाठी संबंधित कॉलेजांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
- डॉ. पराग काळकर (प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

READ ON APP