Hero Image

कल्पक शिक्षणतज्ज्ञ- मीना चंदावरकर

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मीना चंदावरकर यांच्या निधनाने, बालशिक्षणात अनेक नवनव्या संकल्पना राबविणाऱ्या एक कल्पक आणि कृतिशील शिक्षणतज्ज्ञ काळाच्या पडद्याआड गेल्या. सुमारे पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी शिक्षणक्षेत्राला वाहून घेतले आणि शालेय शिक्षण आनंदी व अर्थपूर्ण बनविण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी राबविलेल्या अनेक संकल्पनांची नंतर राज्यातील अनेक शाळा व सरकारनेही अंमलबजावणी केली, हे त्यांचे मोठे यश.
त्या मूळच्या कोकणातील पांग्रड गावच्या. शिक्षण कोकणात व कोल्हापुरात झाले. पुढे पुण्यात वाडिया महाविद्यालयात त्यांनी कला शाखेतील पदवी मिळविली. या अत्यंत कष्टांच्या काळात त्यांनी शिकवण्या घेऊन आणि विविध नोकऱ्या करून आपले व भावंडांचे शिक्षण केले. पुढे एका बहुराष्ट्रीय कंपनीत विपणन संशोधकाची, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ व ‘नवभारत टाइम्स’मध्ये माहिती विभागात; तसेच ‘आयबीएम’ कंपनीत नोकरी केली. याच काळात ज्येष्ठ संगीतकार पं. भास्कर चंदावरकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
नंतर पुण्यातील अभिनव विद्यालयात त्यांनी शिक्षिका म्हणून सेवा सुरू केली आणि पुढील सारे आयुष्य त्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी वाहून घेतले. ‘अभिनव’च्या मुख्याध्यापिका आणि न्यू इंडिया स्कूलच्या संचालक म्हणून त्यांनी बालशिक्षणात अनेक नवनव्या संकल्पना राबविल्या. पूर्व प्राथमिक शिक्षणात परीक्षा, स्पर्धा, गुणवत्ता क्रमांक बंद करणे; तसेच देणग्या बंद करणे, दुसरीपर्यंत मुलाखती घेणे बंद करणे, शाळेचा पहिला दिवस आनंददायी बनविणे, प्रत्येक विद्यार्थ्याचा स्नेहसंमेलनात सहभाग, पाचवीपासून लैंगिक शिक्षण, आजी-आजोबांची शाळा भेट अशा अनेक संकल्पनांचा त्यात समावेश होता.
मुलांचे शिक्षण आनंददायी ठरले पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष होता. मुलांनी केवळ पाठ्यक्रमात हुशार न बनता त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी त्यांच्या कलाने चित्रकला, संगीत, साहित्य यांची आवड निर्माण करण्यावरही त्यांनी भर दिला. पहिलीपासून इंग्रजी शिकविण्याच्या योजनेतही त्यांनी मोठे काम केले. बालमानसशास्त्र विषयावरील, तसेच पालकांसाठीचे त्यांचे लेखन मार्गदर्शक ठरले आहेत. चंदावरकर यांना श्रद्धांजली.

READ ON APP