Hero Image

'आम्ही हरीचे सवंगडे'

-संभाजी महाराज मोरे देहूकर‘आम्ही हरीचे सवंगडे। जुने ठाईचे वेडे बागडे। हाती धरुनी कडे। पाठीसवे वागविले॥’ देव आणि भक्त ही आध्यात्मिक भक्तिभाव भाग्याची अवतार परंपरा युगानुयुगे चालू आहे. देवाने जे जे अवतार घेतले, त्या त्या प्रत्येक अवतारात तुकोबाराय देवाचे आवडते भक्त आणि सवंगडे होते. ‘जे जे झाले अवतार। तुका त्याचे बरोबर॥’ ही तुकोबारायांची आत्मसाक्षात्काराची अनुभूती आहे.
देवाच्या प्रत्येक अवताराच्या वेळी भक्त म्हणून देवाच्या संगतीत राहून, अखंडपणे नामस्मरण केले, म्हणून देव तुकोबारायांचा ऋणी होऊन अंकित राहिला.सत्ययुगात भक्त प्रल्हादाच्या रूपाने तुकोबारायांनी राक्षस कुळात अवतार घेतला. हिरण्यकश्यपूपासून प्रल्हादाला वाचविण्यासाठी देवाने आपले देवपण खर्ची घातले. ‘न साहोव दुःख भक्ताचे या देवा। अवतार घ्यावा लागे रुपा॥’ म्हणून प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी देवाने क्षणिक नरसिंहाच्या रूपात अवतार घेतला. द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाचे सवंगडी म्हणून उद्धवाच्या रूपात तुकोबाराय गोपाळ होते.
‘बहु काळी बहु काळी। आम्ही देवाची गोवळी॥’ गायी राखताना आणि दही-दूध चोरताना तुकोबाराय हे देवाबरोबर होते. उंच शिंक्यावरचे दही-दूध खाताना उद्धवाच्या रूपात असलेले तुकोबाराय देवाच्या पाठीवर उभे राहत होते; कारण प्रल्हादाच्या वेळी भगवंताने हाताला धरून त्यांना कडेवर घेतले होते. म्हणूनच, भक्तपणात आणि देवपणात कोणताच भेदभाव शिल्लक राहिला नाही. त्रेता युगात वालीचा मुलगा अंगद हा तुकोबारायांचा पूर्व अवतार होता. सीतामाईच्या शोधासाठी निघालेले प्रभूरामचंद्र रात्री निद्रा करीत होते; त्या वेळी अंगद पायाजवळ देवाची राखण करायला जागा राहात होता.
हनुमंतरायाच्या आधी अंगद रावणाच्या दरबारात शिष्टाई करायला गेला. ‘वानरा हाती लंका । घेवविली म्हणे तुका॥’देव आणि देवाचे नामस्मरण हाच तुकोबारायांचा पारमार्थिक संसार होता. त्यांना तहान-भूक आठवत नव्हती. देवाच्या नामस्मरणामुळे त्यांचे पोट भरत होते. ‘नको ऐसे झाले अन्न। भूक तहान ते गेली॥’ अशी त्यांची अवस्था होती. उठताना, बसताना, श्वास घेताना, श्वास सोडताना, खाताना, जेवताना... कुठलाही क्षण असो, कुठलीही क्रिया असो, तुकोबारायांच्या मुखात अखंड नामस्मरण होते. इतका दृढ भक्तिभाव आणि एकरूपता होती, म्हणून ‘आम्हा नामाचे चिंतन।
राम कृष्ण नारायण॥’

READ ON APP