Hero Image

दूरदर्शी नेतृत्व- दिनेशकुमार त्रिपाठी

व्हाइस अॅडमिरल दिनेशकुमार त्रिपाठी यांची देशाच्या नौदलप्रमुखपदी नियुक्ती झाल्याने नौदलास एक तंत्रकुशल आणि दूरदर्शी नेतृत्व लाभले आहे. येत्या ३० एप्रिल रोजी निवृत्त होणारे अॅडमिरल आर. हरिकुमार यांच्याकडून त्रिपाठी सूत्रे स्वीकारतील. त्रिपाठी हे मूळचे मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातले. रेवा सैनिकी शाळेत शिक्षण घेतल्यानंतर त्यांची पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) संरक्षण दलाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली.
त्यानंतर त्यांनी गोव्यातील नेव्हल वॉर कॉलेज आणि अमेरिकेतील नेव्हल वॉर कॉलेजमधील अभ्यासक्रम पूर्ण केले. सन १९८५मध्ये ते नौदलात रुजू झाले. सिग्नल कम्युनिकेशन ऑफिसर, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर ऑफिसर, तसेच ‘गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयर, आयएनएस मुंबई’ अशा पदांच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. नौदलातील ‘आयएनएस विनाश’, ‘आयएनएस किर्च’, ‘आयएनएस त्रिशूल’ अशा विविध प्रकारच्या युद्धनौकांच्या संचालनाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग चीफ, भारतीय नौदल अकादमीचे प्रमुख, महासंचालक (नेव्हल ऑपरेशन्स), कार्मिक विभागाचे प्रमुख अशा वेगवेगळ्या विभागांत सेवा केल्याने बहुआयामी अधिकारी म्हणून ते ओळखले जातात.
दूरसंचार तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्र या विषयातील ते तज्ज्ञ मानले जातात. अतिविशिष्ट सेवापदक, नौदल पदक आणि रॉबर्ट ई. बेटमन आदी मान-सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. नौदलापुढे सध्या विविध स्वरूपाची आव्हाने आहेत. गेल्या काही काळात समुद्री चाचे आणि हुती बंडखोरांच्या कारवाया वाढत आहेत. नौदलाने आजवर वीस वेळा कारवाई करून प्रसंगी अन्य देशांच्या जहाजांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडली आहे. बदलत्या भू राजकीय स्थितीमध्ये भारताचे स्थान अधिक व्यापक बनत असल्याचे ते निदर्शक असून त्यामध्ये नौदलाची भूमिका कळीची राहील, हे स्पष्ट आहे.
दुसरीकडे चीन आपल्या विस्तारवादी धोरणातून समुद्री ताकद वाढवत आहे. त्यातच, चीन आणि पाकिस्तान यांच्यातील वाढती जवळीक ही भारताची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. जगभरात युद्धतंत्रात मोठे बदल होत असताना त्या बदलांशी जुळवून घेणारे नेतृत्व त्रिपाठी यांच्या रूपाने भारतीय नौदलास लाभले आहे.

READ ON APP