Hero Image

पुण्यातील असुरक्षितता

पुण्यात बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे असलेल्यांची पोलिस आयुक्तांनी परेड बोलावली असतानाच, वर्दळीच्या जंगली महाराज रस्त्यावर भर दुपारी एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराचा झालेला प्रयत्न शहरातील वाढती गुन्हेगारी अधोरेखित करणारा आहे. अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील घरावर गोळीबार झाल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुण्यात पोलिस आयुक्तांनी सुमारे दोनशे गुन्हेगारांची परेड बोलावली होती.
त्यानंतरही गोळीबाराचा प्रयत्न होत असेल, तर ‘पुण्यातील गुन्हेगारांचे धारिष्ट्य वाढत असून, त्यांना पोलिसांचा पुरेसा धाक राहिलेला नाही,’ असा त्याचा अर्थ होतो. महानगर बनलेल्या पुण्यातील गुन्हेगारी वाढत असल्याने गोळीबाराच्या किंवा कोयत्याने हल्ले करण्याच्या घटनांचा आलेखही चढा राहणार, असा युक्तिवाद केला जातो; परंतु त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही; उलट त्याचे गांभीर्य अधोरेखित होते. मंगळवारच्या घटनेनंतर गुरुवारी पहाटे सिंहगड रस्ता परिसरात गोळीबाराची आणखी एक घटना घडली.
काड्यांची पेटी मागितल्याच्या किरकोळ कारणावरून संबंधितावर गोळ्या झाडल्यानंतर आरोपी पोलिसांसमोर हजर झाले. तीन आठवड्यांपूर्वी कात्रज परिसरात क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलावर गावठी पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली होती. त्याच्या काही दिवस आधी उत्तमनगर परिसरात दरोड्याचा गुन्हा घडला होता; पोलिसांना गुन्हेगारांकडे नंतर गावठी पिस्तूल सापडले होते. या वर्षाच्या सुरुवातीला कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा कोथरूड येथे भरदिवसा गोळ्या घालून खून करण्यात आला होता.
गेल्या काही महिन्यांतील अशा घटनांची यादी लांबू शकते. गेल्या तीन वर्षांत पुण्यात केवळ गोळीबाराच्याच ६७ घटना घडल्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील संघटित गुन्हेगारीही वाढते आहे आणि वैमनस्यातून जीव घेण्याच्या घटनाही वाढत आहेत. याशिवाय गेल्या काही वर्षांपासून पुण्यात कोयता गँगने उच्छाद मांडला आहे. कोयत्याने हल्ले होण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यांत कमी झाले असले, तरी या गुन्ह्याचा धोका टळलेला नाही. शिक्षण, उद्योग, संस्कृती यांसाठी ख्यातनाम असलेल्या पुण्यातील सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, हे यातून स्पष्ट होते.
‘सुरक्षित शहर’ असा पुण्याचा एकेकाळी मोठा लौकीक होता; तो आज राहिलेला नाही. मोठ्या प्रमाणावर झालेले स्थलांतर, वाढलेली लोकसंख्या, बेसुमार वाहने, वाढती विषमता, बेरोजगारी आदी अनेक कारणे यामागे आहेत. मात्र, त्याचबरोबर पोलिसांचा वचक कमी होणे हेही एक कारण आहे. पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

READ ON APP