Hero Image

कहाणी... मुंग्यांच्या स्थलांतराची

- सुजाता बाबरमुंगी हा लहानसा, बराचसा दुर्लक्षित कीटक! मुंग्यांना परिसंस्थेतील अभियंता म्हटले जाते. माती तयार करण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची असते. परंतु हवामान बदलामुळे मुंग्यांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. मुंगी हा थंड रक्ताचा कीटक. मुंग्यांच्या शरीराचे तापमान, चयापचय, इतर शरीरकार्ये वातावरणाच्या तापमानावर अवलंबून असतात.
तापमानातील चढ-उतारांबाबत मुंग्या संवेदनशील असतात; म्हणूनच, वातावरणातील बदलांचा परिसंस्थेवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी त्या चांगले माध्यम ठरतात.ब्राउन आणि ग्रेग या संशोधकांनी १९५७-१९५८मध्ये आणि २०२१-२०२२मध्ये अंदाजे त्याच तारखांना समान सर्वेक्षण केले. या चमूने अमेरिकेतील ग्रेगरी कॅनियनच्या वेगवेगळ्या भागांमधून शेकडो मुंग्यांचे नमुने गोळा केले. पूर्वी कॅनियनमध्ये नोंद न झालेल्या मुंग्यांच्या काही प्रजाती यावेळी आढळल्या. त्यांची संख्याही खूपच अधिक होती.
सहा दशकांपूर्वीच्या तुलनेत १२ मुंग्यांच्या प्रजाती आता दुर्मिळ झाल्याचेही समोर आले. तापमानाच्या विस्तृत श्रेणीमध्ये टिकणाऱ्या मुंग्यांच्या प्रजाती आता वाढल्या आहेत, तर तापमानाच्या अरुंद श्रेणीमध्ये टिकणाऱ्या प्रजाती दुर्मिळ झाल्या आहेत.मुंग्यांच्या विविध प्रजाती परिसंस्थेमध्ये विशिष्ट भूमिका निभावतात. जसे, विशिष्ट प्रकारच्या बिया पसरवणे किंवा विशिष्ट किड्यांची शिकार. परिसंस्थेमध्ये एकाच प्रकारची मुंगी असेल, तर त्या केवळ एकाच प्रकारच्या कार्यामध्ये योगदान देतात, त्यामुळे परिसंस्थेची स्थिरता कमी होते.
एखादी प्रजाती नाहीशी होते, तेव्हा अन्न, परागकण किंवा कीटक नियंत्रणासाठी तिच्यावर अवलंबून असलेल्या इतर जीवांवर परिणाम होतो. हवामान बदलामुळे मुंग्यांच्या जैवविविधतेमध्ये शहरी आणि जंगल अशा दोन्ही ठिकाणी जगभरात बदल होत आहेत. जागतिक स्तरावर कीटकांची संख्या आणि विविधता झपाट्याने कमी होत आहे. या नवीन अभ्यासाने याचा आणखी एक पुरावा मिळाला आहे. याला अनेक शास्त्रज्ञ ‘कीटकांचा विनाशकाल’ म्हणतात. १६ अभ्यासांमधील विश्लेषणावरून दिसून आले आहे की, गेल्या चार दशकांमध्ये कीटकांची संख्या ४५ टक्क्यांनी कमी झाली आहे.
उत्तर अमेरिकेत मोनार्क फुलपाखरांची संख्या गेल्या २० वर्षांत ९० टक्क्यांनी कमी झाली आहे. कोलोरॅडोमध्ये पाचपैकी एका मूळ मधमाशीला धोका आहे.हवामानातील बदलांना प्रतिसाद म्हणून प्रजाती त्यांचे अस्तित्व असलेल्या श्रेणी बदलत आहेत. त्यापैकी काही प्रजाती पसरतात आणि जगतात, तर काहींचा विनाश होत आहे. अशा प्रकारच्या संशोधनामुळे एखाद्या प्रजातींचे समुदाय समजून घेण्यास, त्यांचे परिसंस्थांवर होणारे परिणाम समजण्यास मदत होते.

READ ON APP