Hero Image

लोकप्रियतेच्या शिखरावर

ही मालिका सुरू झाली तेव्हा, आमच्या कोणाकडेच फारसे पैसे नव्हते. कार तर सोडाच, पण टॅक्सीही परवडणं मुश्कील होतं. बी. पी. सिंगही तसाच होता. पण, त्याच्याकडे एक मारुती व्हॅन होती. ती मारुती व्हॅन ‘सी.आय्.डी.’च्या क्रूचाच एक भाग बनली होती. आमची लोकेशन वेगवेगळी असत. आम्ही एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनवर जायला निघालो की रामदास जाधवची स्कूटर माझ्या मदतीला असायची.
तो स्कूटरवाला बडा असामी होता. त्याच्या मागे मी एका हातात माझे कॉस्च्यूम आणि दुसऱ्या हातात रामूचे कॉस्च्यूम घेऊन बसायचो, आमच्या दोघांच्या मधल्या जागेत एका एअर बॅगेत आणखी काही सामान असायचं. त्या काळात हेल्मेट सक्तीची नव्हती. त्यामुळे आमच्या बाजूच्या बसमधली माणसं, ‘सी.आय.डी.’ लोकप्रिय होत गेल्यामुळे आम्हाला लगेच ओळखायची. मग, बसमधून कोणीतरी ओरडायचं, “अरे, तुमच्याकडे गाडी नाही का? टॅक्सी परवडत नाही का?” आम्ही हसून सोडून द्यायचो. समाधान हेच की, लोक आपल्याला आता ओळखायला लागले!बी.पी.
ने ‘सी.आय.डी.’ ला ‘एक शून्य शून्य’सारखं खऱ्या घटनांचं बंधन ठेवलं नव्हतं, त्याला ‘सी.आय.डी.’ ही वास्तव वाटू शकेल अशी काल्पनिक घटनांची मालिका बनवायचं होतं. तो रिसर्चही खूप करायचा, मी अनेकदा त्याच्याबरोबर एशियाटिक लायब्ररीमध्ये गेलोय. त्याच्याकडे ट्रंका भरून पुस्तकं असायची. वाचनातून त्याला एखादा दुवा सापडायचा आणि तो कथानक फुलवायचा. विजय आनंद आणि हिचकॉक ही त्याची प्रेरणा होते. त्यांच्या शैलीला तो मनोमन अनुसरायचा. अनुभवातून बी.पी.ची शैली घडली होती. त्याला ए.सी.पी.
प्रद्युमन हा पाश्चात्त्य पद्धतीचा हवा होता, म्हणून आम्ही सुटाबुटात असणार होतो. मी माझ्याच घरचे कपडे वापरायचो. हळूहळू आमच्या कपडेपटाला नवे कपडे परवडू लागले. मी माझे स्वत:चे कपडे शिवाजी पार्कवर बाबाच्या ‘बॉबॉईज’मधून शिवून घ्यायचो. बाबा म्हणजे लक्ष्मीकांत मोहिले. तो माझा डिझायनर! त्याला कपड्यांचा विलक्षण सेन्स आहे. त्याचं मार्किंग आणि कटिंग जबरदस्त आहे. हिंदी, मराठी इंडस्ट्रीत, राजकीय लोकांत ‘बॉबॉईज’ फेमस आहे, तो भारतीय क्रिकेट संघाचेही सूट्स शिवायचा. हळूहळू आमचा ए.सी.पी.
रेमंड्सचं कापड वापरू लागला. त्या कापडाला फॉल चांगला होता. मी मला आवडणारे टाय खरेदी करू लागलो, त्याचे पैसे मला मिळू लागले. कालांतराने आम्हा सर्वांकडे कार्स आल्या.मी जे पात्र रंगवणार होतो, त्याचं नाव ए.सी.पी. प्रद्युमन ठरलं. मग, ‘दया’ आला. दयाचं नाव दयानंद शेट्टी! तो दिसायला दांडगा, दणकट. बी.पी. म्हणाला, “याच्या नावात कसा काँट्रास्ट आहे बघ. दिसतो कसा आणि नाव काय तर दयानंद! लोकांना हा काँट्रास्ट आवडतो. आपण, याचं नाव छोटं करू या- दया.” नंतर आदित्य श्रीवास्तव आला. बी.पी.नं विचारलं, “शिवाजी, तेरे बेटे का नाम क्या है रे? अच्छा है.” मी म्हणालो, “अभिजित!” “येस.
आदित्यच्या पात्राचं नाव अभिजित.” असं सारं घडत गेलं. आशुतोष गोवारीकर तेव्हा आमच्यात होता, अश्विनी काळसेकर होती- मोठी गोड मुलगी! मनोज वर्मा आला. मनोज तर एक वेगळं रसायन. तो उत्तरेकडचा. एकदम फिट माणूस. तो प्रत्येक शॉटच्या आधी बाजूला जायचा दहा बैठका मारायचा आणि यायचा. सांगायचा, “सर, हम लोग पुलिसवाले है ना? तो फिट लगना चाहिये….” आमचा धनंजय मांद्रेकर एकदम टिपिकल. बी. पी. त्याला सांगायचा, “अरे, कैसे चलता है? तू रोब दिखना चाहीये.” त्याच्यात शेवटपर्यंत फरक पडला नाही. त्याच्याबरोबर असायचा दिनेश फडणीस- तो फ्रेडी झाला होता.
फ्रेडी एकदम लोभसवाणं पात्र. साधा, बावळट प्रश्न विचारणारा, कायम बायकोची आठवण काढणारा आणि तिला घाबरणारा. रामदास जाधव मस्त माणूस. रामूचा एक किस्सा आठवला. रात्रीच्या वेळी आमचं शूटिंग एका घराबाहेर चाललेलं होतं. शोधपथक काम करत होतं. त्या शोधपथकात एक अस्सल पोलिस डॉग आणलेला होता. शूटिंग रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. तो पोलिसी डॉग वैतागलेला. एक शॉट लागला होता. मी एका बाजूला उभा, रामू-रामदास जाधव दुसरीकडे, घराचा दरवाजा लागलेला, तो उघडत नव्हता, दरवाजा तोडायचा होता. पोलिसी डॉग ट्रेनरच्या हातात.
बी.पी. कॅमेराजवळ. त्यानं ॲ‍क्शनची ऑर्डर दिली. मी म्हणालो, दरवाजा तोड दो. रामू पुढं सरसावला आणि कोणाला काही कळायच्या आत त्या पोलिसी डॉगनं त्याच्यावर झेप घेतली. जॅकेट, शर्ट, बनयान या सगळ्यांना पार करून रामूच्या पोटावर चार दातांचा घाव बसला. रक्त ठिबकायला लागलं. आज अंगावर शहारा येतो, पण तेव्हा रामूसह आम्हाला फारसं काही वाटलं नाही. बेभान दिवस होते ते.एका भागाचं शूटिंग उत्तरेला होतं. लडाखच्या जवळ. एका मृतदेहाचा शोध घेण्याची मोहीम चित्रित करायची होती. ज्या भागात पर्यटक नाहीत, बर्फात कोणाच्या पायाचे ठसे नाहीत, अशी जागा शोधायची.
त्यात बर्फ पडत असताना चित्रीकरण करायचं होतं. बर्फात चालणं महाकठीण काम. पायाखालचा बर्फ किती कडक आहे, याचा अंदाज येत नाही. त्यात मिस्ट्री स्टोरी. रेकी करणाऱ्यांना एक जागा सापडली. बी. पी. दयाला म्हणाला, “दया तू आगे रहनेका.” दयाची इमेज तशी बनलेली होती, पठ्ठ्या रिस्क उचलायला सदैव तयार. आता दया, अभिजित प्रेताचा शोध घेत जाणार. त्यांच्या पाठोपाठ मला जायचं होतं. बी.पी. मला त्यांच्याबरोबर जाऊ देई ना. मी म्हणालो, “अरे, ही पोरं बर्फात जाणार, आणि ए.सी.पी. काय बाजूला राहाणार?” मी त्याचं ऐकलं नाही.
आमच्या पायात आधी पायमोजे, त्यावर प्लास्टिक पिशवी, त्यावर दोन पायमोजे, त्यानंतर गमबूट, पुन्हा ते दोरीने घट्ट बांधलेले आणि त्यावर कपडे. सर्व डबल साईज्ड. हिमदंश होऊ नये याची ही काळजी! अशा स्थितीत जमिनीवर चालणं मुश्कील, इथं बर्फात चालायचं होतं. शूटिंग सुरू झालं. दया, अभिजित पाय रोवत पन्नास एक पावलं चालत गेले. त्यांना काहीतरी दिसलं, त्यांनी प्रद्युमनला हाक दिली, “सर, यह देखिये.” दयाजवळ येतो तोच अचानक माझा पाय बर्फात खोल गेला, गळ्यापर्यंत आत गेलो, हात वर होते; क्षणात दयानंद पुढे आला, मला गपदिशी धरला.
आदित्य धावला. दोघांनी माझे हात धरून मला वरती ओढलं. तिथं दोन दगडांमधली खाई होती. वाचलो. काही क्षणांनंतर शॉट पूर्ण केला.“दया, दरवाजा तोड दो.” हे वाक्य तसं तसा साधं आहे. पण ते आयकॉनिक वाक्य बनलं. प्रद्युमन बुद्धिमान आहे, तो त्या यूनिटचा मेंदू आहे. तो कर्तव्यकठोर आहे. वेळप्रसंगी सख्ख्या मुलाला, तो ड्रग्जवाल्यांशी हातमिळवणी करतो, म्हणून ठार मारतो, पण त्याच्या पोटात मायाही आहे. अभिजित हा पूर्वी पोलिसांत असतो, तो काही कारणांमुळे भ्रमिष्ट होतो, अभिजितवर योग्य उपचार करून प्रद्युमन त्याला ‘सी.आय्.डी.’ टीममध्ये घेतो.
ए.सी.पी.ची व्यक्तिरेखा अशी विलक्षण आहे. ए.सी.पी.ची प्रतिमा ‘लार्जर दॅन लाईफ’ करण्यासाठी कॅमेरा अगदी थोडासा लो अँगलनं लावायचं ठरलं, त्यामुळे ए.सी.पी. अधिक उंच दिसायला लागला. त्याच्या हातात विचार करताना एक पेपरवेट असायचा, तो हातातच गोल गोल फिरायला लागला, कधी त्याच्या हातात चेंडू आला. एकदा सहज बोलता बोलता मी बी.पी.ला काही तरी समजावून देत होतो. मी नाटकवाला, बोलताना माझा आख्खा देह बोलतो. माझी बोटं विशिष्ट प्रकारे अर्ध गोलाकृती अकारात फिरत होती. बी.पी.नं मला थांबवलं, मला म्हणाला, “तू आत्ता बोलताना विचार करतोयस, त्यावेळी तुझ्या हाताची, बोटांची जी हालचाल चालू आहे ना, ती प्रद्युमनची विचार करतानाची शैली ठेवू या.” अलीकडे ‘सी.आय्.डी.’वरच्या अनेक मिम्समध्ये ती हालचाल येत राहाते.
एका शोधमोहिमेत ‘सी.आय्.डी.’ पथकाला एक बंद घर उघडायचं असतं. ते कसं उघडणार? ए.सी.पी. प्रद्युमनने दयाला ऑर्डर दिली, “दया, दरवाजा तोड दो.” अतिभव्य देहयष्टीच्या दयानं दरवाजा तोडला आणि मिम्सना आणखी एक वाक्य मिळालं. भारतीय मालिकांच्या इतिहासातल्या ह्या सर्वाधिक लोकप्रिय ठरू शकतील, अशा गोष्टी आम्हाला नकळत मालिकेत आल्या आणि त्या आयकॉनिक बनल्या.

READ ON APP