Hero Image

दैवाचा खेळ

-डॉ. दत्ता कोहिनकरअनेक घटनांचा मागोवा घेतल्यावर कर्मफल सिद्धान्ताची निश्‍चिती अनुभवास येते. गजरे विकणारी व्यक्ती समाजकल्याणमंत्री होते; तर चहा विकणारी व्यक्ती पंतप्रधान होते.‘मी राजा असून आंधळा का?’ या धृतराष्ट्राच्या प्रश्‍नाला उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण, मागच्या जन्मात उन्मत्तपणे पक्ष्यांचे डोळे फोडले या कर्मफलाचा दाखला त्याला देतात.एका माणसाने भावविवश होऊन रडत रडत वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना मुक्ती मिळण्यासाठी भगवान बुद्धांकडे आग्रह धरला.
बुद्धांनी त्याला दोन मडकी आणायला सांगून एका मडक्यात तूप व एका मडक्यात खडी भरावयास लावली. ती तलावात ठेवून काठीचा प्रहार करावयास लावले. मडकी फुटली. तूप तरंगले. खडी बुडाली. बुद्ध म्हणाले, ‘आता तुला जे कर्मकांड करावयाचे ते कर. ज्यावेळेस ही खडी वर येईल व तूप खाली जाईल त्यावेळेस तुझे वडील मुक्त होतील.’ तो गोंधळलेल्या स्वरात म्हणाला, ‘भगवान पण ही खडी जाड व वजनदार. ती पाण्यावर कशी येणार? हे तूप हलके. ते खाली कसे जाणार? निसर्गनियमानुसार हे होऊ शकत नाही. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, तुझ्या पित्याने या तुपासारखे हलके-फुलके सत्कर्म केले असेल तर ते वर म्हणजे सतगतीला जाणार व या दगडांसारखे जड (त्रासदायक) काम केले असेल तर ते खालीच (अधोगतीला) जाणार.
हाच निसर्गाचा नियम.मग आपल्या हातात काय आहे? आपले भविष्य काय असावे, या दृष्टीने आपले वर्तन, आचरण आणि वृत्ती असावी. म्हणून सत्कर्म करा व यम-नियमांचे पालन करून सुखाचे अधिकारी व्हा. सर्व पापांपासून दूर रहा. शास्त्रीय ज्ञानाच्या बळावर जीवन समृद्ध व सुखावह करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करा पण कधी कधी जीवनाला वेढणारा अज्ञाताचा, अनिश्‍चितीचा जो कर्मफल सिद्धान्ताचा भाग आहे तो ही स्वीकारण्याची तयारी असू द्या.आपल्याला त्या कर्मफळातून बोध घेऊन सुयोग्य काय आहे, हे ठरविणे, जाणणे ही आपली पुढची गती ठरविते.
कर्मफळ कसेही असो; मन मात्र समतेत प्रतिष्ठापित करा. या मनाची समता प्रस्थापित करण्यासाठी रोज कमीत कमी दहा मिनिटे सकाळी व दहा मिनिटे सायंकाळी मनाचा सम्यक व्यायाम करा. त्याप्रमाणे ध्यान करा. श्वासाच्या साह्याने मन एकाग्र व निर्मल करणाऱ्या आनापान व विपश्यना ध्यान पद्धतीचा अभ्यास करा. हेच यशस्वी जीवनाचे गमक आहे.

READ ON APP