Hero Image

पोस्टल बॅलेटची संख्या वाढणार; १३९७ कर्मचाऱ्यांना वितरण, दिव्यांग तसेच वयस्कर मतदारांनाही सुविधा

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : निवडणुकीत कर्मचाऱ्यांसोबत दिव्यांग व ८५ वर्षांवरील मतदारांना पोस्टल बॅलेटची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पोस्टल बॅलेटची संख्या वाढणार असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत १ हजार ३९७ कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेटचे वितरण करण्यात आले.लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेकसाठी १९ एप्रिलला मतदान होईल. या निवडणुकीच्या प्रक्रियेत असलेल्या कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट व मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. दोन्ही मतदारसंघांत १८ हजारांवर कर्मचाऱ्यांची मदत घेण्‍यात येणार आहे. यातील १,३९७ कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेटचे वितरण करण्यात आले. ५२७ कर्मचाऱ्यांकडून पोस्टल बॅलेट निवडणूक विभागाला प्राप्त झाले. तर केंद्राच्या सेवेत असलेल्या ४३५ मतदारांना पोस्टल बॅलेट पुरविण्यात आले असून ८ जणांकडून पोस्टल बॅलेट आल्याची माहिती संबंधित निवडणूक नोडल अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
त्याच प्रमाणे यंदा प्रथमच ४० टक्यांपेक्षा जास्त दिव्यांग व ८५ वर्षांवरील मतदारांसाठी घरीच मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. ही सुविधा घेणाऱ्यांना ‘फॉर्म १२ डी’ भरून द्यायचा होता. जिल्ह्यात ५९ हजार ९८ मतदार ८५पेक्षा जास्त वयाचे व २० हजार ३७ दिव्यांग मतदार आहेत. यातील २,३६० मतदारांनी हा ‘फॉर्म १२ डी’ भरून दिला आहे. त्यामुळे त्यांना घरीच मतदान करण्याची सोय उपलब्ध होईल. यांना पोस्टल बॅलेटची सुविधा मिळेल. तीन दिवस ही सुविधा राहणार आहे. निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांसह उमेदवारांच्या प्रतिनिधीसमक्ष ही प्रक्रिया राबवण्यात येईल.

READ ON APP