Hero Image

अवैध वृक्षतोड; वन विभागाची मुळशीत कारवाई, विनापरवाना वृक्षतोडीमुळे ठोठावला आठ लाखांचा दंड

म. टा. प्रतिनिधी, पुणे : मुळशी तालुक्यात विकासाच्या नावाखाली विनापरवाना सुरू असलेल्या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वन विभागाने नुकतीच एक मोठी कारवाई केली. प्रशासकीय परवानगीशिवाय ८०० झाडे तोडणाऱ्या विकासकावर कारवाई करून वन विभागाने आठ लाख रुपयांचा दंड ठोठावला. त्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात यावे, यासाठी आरोपींकडून तातडीने दंडाची रक्कमही वसूल केली.मुळशी तालुक्यातील नेरे भागात हा प्रकार घडला.
या गावात कार्यरत वसुंधरा सामाजिक उन्नती वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन सहकारी संस्थेने मार्च महिन्यात मुळशी वन विभागाच्या भरे येथील कार्यालयात वृक्षतोडीची तक्रार दाखल केली होती. संस्थेच्या मालकी क्षेत्रात २०१६मध्ये लावलेले चारशे वृक्ष आणि नैसर्गिकरीत्या उगवलेल्या वृक्षांची अवैध वृक्षतोड झाल्याची त्यांची तक्रार होती. वन विभागाच्या घोटावडे वनपरिमंडळ अधिकारी प्रज्ञा बनसोडे, कासारसाई नियतक्षेत्राचे वनरक्षक पांडुरंग कोपणर यांनी पौड वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जागेवर जाऊन पाहणी केली.
त्या वेळी सुमारे ८०० झाडांची तोड झाल्याचे लक्षात आले.‘तक्रारीमध्ये अतुल साठे, बाबासाहेब बुचडे यांसह ३० ते ४० जणांनी मिळून ही वृक्षतोड केल्याचे अर्जदारांनी नमूद केले होते. पुढील चौकशीसाठी आरोपींना नोटीस बजावली असता, त्यांनी वन परिक्षेत्र कार्यालयात येऊन जबाब नोंदवला; गुन्हा कबूल केला. सरकारी नियमानुसार अपेक्षित असलेला दंड भरण्याची तयारी असल्याचे जबाबात लिहून दिले. नियमानुसार प्रति झाड एक हजार रुपयांप्रमाणे एकूण आठ लाख रुपये दंड आम्ही त्यांच्याकडून वसूल केला आहे,’ अशी माहिती पौड वन परिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण यांनी दिली.विकासप्रकल्पांच्या नावाखाली मुळशी भागात वृक्षतोडीचे प्रमाण वाढल्याने आम्ही कठोर कारवाई मोहीम हाती घेतली आहे.
वृक्षतोड करणे अनिवार्य असल्यास वन विभागाकडे अर्ज दाखल करणे बंधनकारक आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिल्यावर गरज असल्यास आमचे पथक वृक्षतोडीस परवानी देते. नेरेतील कारवाईमुळे या भागातील विकसकांना वृक्षतोड करणे किती महागात पडू शकते याची जाणीव झाली आहे.- संतोष चव्हाण, वन परिक्षेत्र अधिकारी, पौड

READ ON APP