Hero Image

नरसिंग यादवची भारतीय कुस्ती महासंघाच्या अॅथलीट आयोगाच्या अध्यक्षपदी निवड

वाराणसी : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील माजी सुवर्ण पदकविजेता कुस्तीगीर नरसिंग यादवची भारतीय कुस्ती महासंघाच्या अ‍ॅथलीट आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. बुधवारी झालेली ही निवडदेखील जागतिक कुस्ती संघटनेच्या अनिवार्य सूचनांचा भाग आहे. या आयोगातील सात पदांसाठी आठ उमेदवार रिंगणात होते. ज्यासाठी मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्यात आली.
निवड झालेल्या सात सदस्यांनी नरसिंगची अध्यक्षपदी निवड केली. साहिल (दिल्ली), स्मिता ए. एस (केरळ), भारती भाघेई (उत्तर प्रदेश), खुशबू एस. पवार (गुजरात), निकी (हरयाणा) आणि श्वेता दुबे (बंगाल) यांचा आयोगात समावेश आहे.२०१६च्या रिओ ऑलिम्पिकआधी नरसिंग आणि दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेता मल्ल सुशीलकुमार यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. दुखापतीमुळे सुशीलला पात्रता स्पर्धांत भाग घेता आला नाही. त्यामुळे ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या नरसिंगसह निवड चाचणी घेण्याची विनंती करत सुशीलने न्यायालयाचे दार ठोठावले होते.
दिल्ली उच्च न्यायालयाने सुशीलचे अपील फेटाळल्यानंतर नरसिंगचा ऑलिम्पिकमार्ग मोकळा झाला होता. मात्र ऑलिम्पिकसाठी रिओमध्ये दाखल झाल्यानंतर नरसिंग दोन उत्तेजक चाचण्यांमध्ये दोषी आढळला. क्रीडा लवादाने त्यांच्यावर चार वर्षांची बंदी घातली. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी पथकाने (नाडा) नरसिंगच निर्दोष असल्याचा अहवाल देत; त्याच्याविरुद्ध कट रचल्याचे म्हटले होते.नरसिंग आणि भारतासाठी नामुष्की म्हणजे रिओ ऑलिम्पिकमध्ये नरसिंगचा सलामीचा सामना रंगणार, त्याच्या आदल्यादिवशी उत्तेजक चाचणीचा निकाल आला.
ज्यामुळे त्याला तात्काळ स्पर्धा सोडून मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले होते. नरसिंगवरील बंदी जुलै २०२०मध्ये संपुष्टात आली. मात्र नरसिंगनेही हे उत्तेजकाचे नाट्य आपल्याविरुद्ध कटकारस्थान असल्याचे म्हटले होते. सर्व पात्रता स्पर्धेनंतरच निवड चाचणीचा निर्णयऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेसाठी अंतिम भारतीय संघ निवडण्याबाबतचा निर्णय सर्व पात्रता स्पर्धा संपल्यानंतरच होईल, असे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी सांगितले. जागतिक पात्रता स्पर्धा इस्तंबूलला ९ ते १२ मे दरम्यान होणार आहे.
सर्व पात्रता स्पर्धा संपल्यावर पात्र ठरलेल्या कोणत्या गटात निवड चाचणी आवश्यक आहे, याचा निर्णय निवड समिती घेणार आहे. आत्तापर्यंत महिलांच्या स्पर्धेतील चार गटासाठी भारतीयांनी पात्रता जिंकली आहे. दरम्यान, इस्तंबूल स्पर्धेपूर्वी नव्याने निवड चाचणी घेण्याबाबत सोमवारी निर्णय अपेक्षित आहे.

READ ON APP