Hero Image

Israel Gaza War: गाझामध्ये इस्त्रायलच्या हल्ल्यात २२ ठार, मृतांमध्ये १८ बालकांचा समावेश

वृत्तसंस्था, रफा (गाझा पट्टी) : इस्रायलने गाझापट्टीच्या दक्षिणेला असलेल्या रफा शहरावर रात्री केलेल्या हल्ल्यात २२ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये १४ बालकांचा समावेश आहे. अमेरिका त्यांचा मित्रदेश असलेल्या इस्रायलला अब्जावधी डॉलरचे लष्करी साह्य देण्याच्या तयारीत असताना हा हल्ला झाला आहे.गाझापट्टीत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, येथील २३ लाख लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक लोकांनी रफा शहरात आश्रय घेतला असून, या शहरावर इस्रायलकडून जवळजवळ दररोज हल्ले होत आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवरून शांततेचे आवाहन केले जात असतानाही इजिप्तच्या सीमेजवळ असलेल्या रफा शहरावरील हल्ले अधिक तीव्र करण्याची तयारी इस्रायलने चालवली आहे.रफामध्ये झालेल्या पहिल्या हल्ल्यात एका जोडप्यासह त्यांच्या तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. यातील गर्भवती पत्नीच्या बाळाचा जीव वाचवण्यात आला. मात्र, दुसऱ्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील दोन महिलांचा आणि १७ मुलांचा मृत्यू झाला. अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहाने शनिवारीच इस्रायलला २६ अब्ज डॉलरचे पॅकेज मंजूर केले असून, यात गाझामध्ये माणुसकीच्या भावनेतून मदतीसाठी नऊ अब्ज डॉलर देण्यात आले आहेत.
इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत ३४ हजार पॅलेस्टिनी मारले गेले असून, गाझातील दोन शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. गाझातील ८० टक्के लोक घरे सोडून सुरक्षित जागी आश्रयाला गेले असून, येथे अन्नटंचाईची भीती आहे. इस्रायल-हमासमधील संघर्ष मागील सहा महिन्यांहून अधिक काळ सुरू असून, आता यामुळे प्रादेशिक अस्थिरता निर्माण होण्याची भीती आहे. पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायल हे इराण आणि त्यांच्याशी संबंधित दहशतवादी गटांविरोधात उभे राहिले आहेत. इराण आणि इस्रायल यांनी अलीकडेच परस्परांना लक्ष्य करून हल्ला केल्यानंतर, या दोन देशांमध्ये युद्ध सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे.

READ ON APP