Hero Image

सराव करताना अनर्थ, जपानच्या नौदलाची २ हेलिकॉप्टर कोसळली थेट पॅसिफिक महासागरात; एकाचा मृत्यू, ७ बेपत्ता

वृत्तसंस्था, टोकियो : जपानच्या नौदलाची दोन हेलिकॉप्टर टोकियोच्या दक्षिणेला पॅसिफिक महासागरात कोसळली. रात्रीच्या वेळी सराव करीत असताना ही दुर्घटना घडली. यात एकाचा मृत्यू झाला असून, सात जण बेपत्ता आहेत.मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्सची दोन एसएच-६० के हेलिकॉप्टर रात्रीच्या वेळी सराव करीत होती. या हेलिकॉप्टरमध्ये प्रत्येकी चार कर्मचारी होते.
टोकियोपासून सुमारे ६०० किलोमीटर दक्षिणेस असलेल्या तोरिशिमा बेटाजवळ शनिवारी रात्री त्यांचा संपर्क तुटला. अपघाताचे कारण समजू शकले नाही. मात्र, दोन्ही हेलिकॉप्टरची टक्कर झाल्याने ती पाण्यात कोसळली असावीत, असा अंदाज संरक्षणमंत्री मिनोरू किहारा यांनी वर्तवला.जपानने १२ युद्धनौका आणि सात विमानांच्या मदतीने शोध आणि बचावकार्य सुरू केले आहे. जपानच्या तटरक्षक दलाच्या गस्ती नौका आणि विमानेही या मोहिमेत सहभागी झाली आहेत. अपघाताचे कारण स्पष्ट होत नाही आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नाहीत, तोपर्यंत एसएच-६० विमानांचे प्रशिक्षण स्थगित केले जाईल, असे नौदलाचे प्रमुख अॅडमिरल रिओ साकाई यांनी स्पष्ट केले.
एक हेलिकॉप्टर नागासाकी येथील हवाई तळाचे होते, तर दुसरे टोकुशिमा प्रांतातील तळावरील होते. शनिवारच्या प्रशिक्षणात केवळ जपानी नौदलाचा सहभाग होता आणि तो बहुराष्ट्रीय सरावाचा भाग नव्हता, असेही त्यांनी सांगितले.

READ ON APP