ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वीच कर्णधार शुबमन गिलला इशारा, टीम इंडियाबाबत वर्तवलं असं भाकीत
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड झाली असून शुबमन गिलकडे संघाची धुरा असणार आहे. या मालिकेपासून शुबमन गिल संघाची सूत्र हाती घेणार आहे. वनड़े वर्ल्डकप 2027 स्पर्धा समोर ठेवून बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. पण शुबमन गिलसमोर ऑस्ट्रेलियाचा कठीण पेपर असणार आहे. 19 ऑक्टोबरपासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन वनडे सामने खेळणार आहे. त्यानंतर टी20 मालिका होईल. पण सर्वांचं लक्ष हे वनडे मालिकेकडे असेल.कारण ऑस्ट्रेलियाने भारताचं वनडे वर्ल्डकपचं स्वप्न धुळीस मिळवलं होतं. या संघापासून आता शुबमन गिल वनडेचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे भारताला शुबमन गिल यशाच्या शिखरावर घेऊन जाईल का? ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताला वनडे मालिकेत विजय मिळवून देईल का? या मालिकेपूर्वीच शाब्दिक चकमक सुरु झाली आहे.
भारत ऑस्ट्रेलिया मालिका सुरु होण्यापूर्वीच कांगारूंकडून आक्रमक विधानं सुरु झाली आहेत. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सची एक जाहीरात चर्चेचा विषय ठरली आहे. यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर टीका करत आहे. आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंचने गिलची सुरुवात खराब होईल असं भाकीत वर्तवलं आहे. आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत फिंच म्हणाला की, ‘ही एक उत्तम मालिका असणार आहे. भारताविरुद्ध चांगलीच असते. विराटच्या पुनरागमनामुळे रंगत वाढणार आहे. कारण तो ऑश्ट्रेलियाविरुद्ध चांगलं खेळतो.’
‘कागदावरील आकडेवारी पाहिली तर दोन्ही संघात उत्तम स्पर्धा दिसते. पण मला वाटते की ऑस्ट्रेलिया वनडे मालिका 2-1 ने जिंकेल. पण हे वाटतं तितकं सोपं नाही. कारण भारत हा चांगला संघ आहे. त्यामुळे ही मालिका चांगली असेल. शुबमन गिलने आधीच सिद्ध केलं आहे की कसोटी क्रिकेटमध्ये चांगला कर्णधार आहे. त्यामुळे मला खात्री आहे की येथे काही वेगळे होणार नाही.’, असं फिंच म्हणाला. दरम्यान, भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना 19 ऑक्टोबरला पर्थवर होईल. 23 ऑक्टोबरला एडिलेडवर आणि 25 ऑक्टोबरला सिडनीत सामना होईल.